वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
बाळापुर – वाडोळा मार्गावरील धनमाळ शेतशिवारात अंदाजे २२ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह अत्यंत जखमी अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना २० नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.
शेतकरी प्रभाकर लोखंडे यांच्या शेतात नियमित कामकाजासाठी गेलेल्या कामगारांना मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. मृतदेह झुडपात पडलेल्या अवस्थेत आढळला असून शरीरावर गंभीर जखमा दिसून आल्याने संशय वाढला आहे. घटनास्थळावर बाळापुर पोलिस स्टेशनचे अधिकारी प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक संजीव हिवाळे आणि त्यांच्या टीमने पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला.
पोलिसांनी घटनास्थळाचा सखोल तपास करत तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मृतदेह पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी तो रुग्णालयात पाठवला आहे.
या प्रकरणात तरुणीचा मृत्यू अपघात, खून की अन्य कारणामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहेत.


Post a Comment
0 Comments