वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक : मोहन दिपके .
हिंगोली – उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी इसापूर धरणातून तीन आवर्तने सोडण्यास मंजुरी देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान सोडण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक आवर्तनाचा कालावधी 20 दिवसांचा असणार असून शेतकऱ्यांनी वेळेचे काटेकोर नियोजन करून पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले.
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत केली होती. त्यानुसार तीन आवर्तनांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पहिले आवर्तन 15 डिसेंबर ते 4 जानेवारी, दुसरे 8 जानेवारी ते 28 जानेवारी तर तिसरे आवर्तन 5 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सोडले जाणार आहे. पावसाळी किंवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास तारखांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची विभागीय शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी धरणातील उपलब्ध 100 टक्के जिवंत पाणीसाठ्यावर आधारित रब्बी व उन्हाळी हंगामाचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळी हंगामासाठी स्वतंत्र बैठक घेऊन मान्यता देण्यात येणार आहे. इसापूर प्रकल्पाच्या डावा व उजवा कालवा तसेच वितरण व्यवस्थेद्वारे प्राप्त मागणीनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे.
सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास लाभधारकांनी नमुना क्रमांक 7 व 7-अ मधील पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात अनिवार्यपणे सादर करावा. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागणार आहे. अर्जासोबत उपसा परवानगीची प्रत, अपत्य प्रमाणपत्र, तसेच अल्प/अत्यल्प भूधारक असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
शेतातील शेतचारी स्वच्छ राखण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांची असेल. तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठ्यात अडथळा आल्यास विभाग जबाबदार राहणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंजुरी रद्द करण्यात येईल. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम व विभागीय नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments