वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
निंबी (प्रतिनिधी) – गेल्या ७० वर्षांपासून गावात एकही पक्की रस्ता न झाल्याच्या निषेधार्थ निंबी ग्रामस्थांनी आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदन वाडगाव तालुक्यातील निंबी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निंबी येथील नागरिक एकमताने निर्णय घेत असून, गावाला जोडणारा एकमेव सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून पूर्णपणे खड्डेमय व जीर्ण अवस्थेत आहे. पावसाळ्यात हा रस्ता वाहून जातो तर उन्हाळ्यात धूळ व दगडांनी प्रवास करणे अशक्य होते. जिल्हा परिषदेकडून या रस्त्याची चौकशी अनेकदा केली असली तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.
स्वातंत्र्यानंतर देशात अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाले असताना, निंबी गावाचा रस्ता केवळ दुर्लक्षित राहिल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. निवेदनात सांगितले आहे की, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासकीय स्तरावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन बाजारात नेण्यासाठी, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि नागरिकांना दैनंदिन कामांसाठी हा जीवघेणा रस्ता वापरावा लागत आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती न घेतल्यास येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल. ग्रामविकासासाठी रस्त्याची गरज अत्यंत महत्त्वाची असून, या प्रश्नावर ठोस पावले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



Post a Comment
0 Comments