वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर – येथून पुण्याकडे जाणाऱ्या प्रस्तावित नव्या महामार्गाचा अधिकृत आराखडा अद्याप सरकारने जाहीर केलेला नसतानाही सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका ‘अनधिकृत नकाशा’मुळे जिल्ह्यात जमीनबाजारात प्रचंड हलचल निर्माण झाली आहे. नकाशा व्हायरल होताच महामार्गाच्या संभाव्य मार्गावर येणाऱ्या गावांमध्ये जमीन खरेदीसाठी श्रीमंत आणि बिल्डर वर्गाची चढाओढ सुरू झाली आहे.
गेल्या दोन दिवसांत विशेषतः वडगाव कोल्हाटी, करमाड, निपाणी, कन्नड रोड परिसर, तसेच सावंगी–वायगाव पट्ट्यात प्लॉटचे व्यवहार वेगाने सुरू झाले असल्याची माहिती स्थानिक दलालांकडून मिळत आहे. काही ठिकाणी तर जमीनमालकांना बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट रकमेची ऑफर देऊन जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
महामार्गाचा नकाशा अधिकृतरीत्या प्रसिद्ध न झाल्याने शेतकरी व नागरिक संभ्रमात आहेत. “सरकारी कागदावर काहीही स्पष्ट नाही, पण बाहेरचे लोक येऊन जमीन मोजमाप पाहत आहेत. अचानक एवढी धावपळ का?” असा प्रश्न अनेक शेतकरी विचारू लागले आहेत. भविष्यातील जमिनीचा भाव वाढेल या अंदाजाने काही जमीनमालक विक्रीकडे झुकत असले, तरी अनेकांना आपली शेती गमावण्याची भीतीही वाटत आहे.
प्रशासनाकडूनही यासंदर्भात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. “अधिकृत अधिसूचना येईपर्यंत कुणीही अफवांवर आधारित व्यवहार करू नयेत,” असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नकाशाचा स्रोतही स्पष्ट नसल्याने ही माहिती कितपत खरी याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, नागरिकांनीही या प्रकल्पाबाबत पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.



Post a Comment
0 Comments