वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
वाशीम : क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वाशीम येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहात भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. परिसरातील आदिवासी बांधव, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महान क्रांतीवीरांच्या विचारांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. दिलीपराव रणमले उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून प्रा. डॉ. सखाराम डाखोरे (वसई, मुंबई) आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष व राज्य सहसचिव तसेच एनडिएमजेचे पदाधिकारी पी.एस. खंदारे यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या प्रभावी भाषणात डॉ. सखाराम डाखोरे म्हणाले की, “बिरसा मुंडा यांनी वयाच्या अवघ्या १५ वर्षी इंग्रजी राजवटीविरोधात तसेच ब्राह्मणवादी सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थेविरुद्ध उलगुलान करून बहुजन समाजासाठी क्रांतीचे रणशिंग फुंकले.” त्यांनी रावण हा मातृरक्षक राजा होता व त्याचा विद्यमान अभ्यासात होणारा अपमान ही आदिवासी संस्कृतीविरोधी हेतुपुरस्सर रचना असल्याचे स्पष्ट केले. तसेच आदिवासी समाजाने आपली बोलीभाषा, परंपरा, संस्कृती आणि निसर्गसंपत्ती जपण्याचे महत्व पटवून दिले.
पी.एस. खंदारे यांनी सातवाहन ते आंधक बौद्ध भिक्षू आणि तेथून आंध्र प्रदेश निर्मितीचा आदिवासी इतिहास सविस्तर सांगितला. तसेच एनडिएमजेच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे एट्रोसिटी कायद्यानुसार खून झालेल्या सर्व पीडितांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांनी घेतल्याचे सांगून आदिवासी समाजाला दिलासा मिळाल्याचे नमूद केले. भविष्यात अनुसूचित जाती व जमातींचा निधी लॅप्स किंवा इतरत्र न वळवता त्यासाठी स्वतंत्र बजेट कायदा व्हावा, यासाठी आदिवासी बांधवांनी एनडिएमजेसोबत संघटितरित्या काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख उपस्थितीमध्ये गृहपाल श्री. देशमुख सर, श्री. वानखेडे सर, सौ. देशमुख मॅडम, सौ. ऊईके मॅडम, तसेच सेवानिवृत्त प्राचार्य भिमराव लोंखडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. एम.बी. डाखोरे यांनी केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीच्या या कार्यक्रमास वाशीम जिल्ह्यातील आदिवासी बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम संस्मरणीय केला.



Post a Comment
0 Comments