वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड
किन्हवली ● बालदिनानिमित्त शहा चंदुलाल सरुपचंद विद्यालयात महाराष्ट्रातील ख्यातनाम रानकवी तुकाराम धांडे यांच्या उपस्थितीत भव्य काव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “कवी आपल्या भेटीला” या शीर्षकाखाली भरलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम तीन तास चालला आणि धांडे यांच्या ओघवत्या कवितांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर होते. प्रमुख वक्ते म्हणून रानकवी तुकाराम धांडे उपस्थित होते. तसेच उपमुख्याध्यापक एम.व्ही. होळीकर सर, पर्यवेक्षक एस.जी. निळे सर, सांस्कृतिक प्रमुख श्रीम. अर्चना देसले मॅडम, ज्युनिअरचे सांस्कृतिक प्रमुख आरे सर, डी.के. विशे सर, सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य मान्यवर म्हणून उपस्थित होते. व्ही.व्ही. फर्डे सर आणि रिकी खाडे सर यांच्या स्वरगंध मंचतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन, स्वागतगीत व ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपमुख्याध्यापक एम.व्ही. होळीकर सर यांनी प्रास्ताविक, तर ज्युनिअरचे सांस्कृतिक प्रमुख अशोक आरे सर यांनी रानकवी तुकाराम धांडे यांच्या साहित्यिक प्रवासाचा परिचय करून दिला. कार्यक्रमात विद्यालयातील क्रीडा स्पर्धा व कराटे जिल्हा स्तरावर सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांसह क्रीडाप्रशिक्षक शाहरुख पठाण यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थीनी संध्या भेरे हिने बालदिनाचे महत्व उलगडून सांगितले. मानसी घोडविंदे हिने ‘मानवता धर्म’ ही स्वरचित कविता सादर करून प्रशंसा मिळवली.
यानंतर रानकवी तुकाराम धांडे यांच्या काव्यमैफलीला सुरुवात झाली. त्यांनी पाठ्यपुस्तकातील कविता, स्वरचित निसर्ग कविता, तुकोबा आणि आजोबा, आई होती तेव्हा, रानवेडी, वाटणी अशा अनेक अप्रतिम रचना सादर करून उपस्थितांना भावविभोर केले.
इ. ९ वीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले आदिवासी तारपा नृत्य सादर करून कवी धांडे यांना मनोभावे मानवंदना दिली. हे नृत्य सौ. रत्नप्रभा करण मॅडम आणि एस.एल. पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साकारले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक वेखंडे सर यांनी “ज्यांच्या कविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहेत त्या मान्यवर कवींचे विद्यालयात आगमन हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे,” असे सांगत रानकवींचे मन:पूर्वक आभार मानले. तसेच स्वतःची ‘बा नांगर हाकीतो’ ही कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख श्रीम. अर्चना देसले मॅडम यांनी केले. संपूर्ण नियोजन सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांनी केले. साऊंड सिस्टीमचे नियोजन भरत वरकुटे सर यांनी तर छायाचित्रण ओमकार घुडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन श्री. के.डी. करण सर यांनी केले.




Post a Comment
0 Comments