वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
शंकर गायकवाड
मुरबाड :मुरबाड तालुक्यातील अनेक शाळांकडून बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE) अंतर्गत २५% आरक्षणाची योग्य अंमलबजावणी न करता विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष श्री. दिपक अशोक वाघचौडे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी पंचायत समिती, मुरबाड येथील मा. गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन 2009 ते 2025 पर्यंतच्या सर्व RTE प्रवेशांची सखोल चौकशी करून दोषी शाळांवर दंडात्मक कारवाई तसेच मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
श्री. वाघचौडे यांनी आरोप केला की —
अनेक शाळा RTE अंतर्गत विद्यार्थ्यांना फी माफी देतात, परंतु इतर सर्व शैक्षणिक खर्च शासनाकडून मिळूनही पालकांकडून साहित्य, वह्या, पुस्तके, गणवेश आदींची रक्कम वसूल करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे.
त्यांनी पुढे मागणी केली की —
RTE अंतर्गत मिळालेल्या निधीचा योग्य वापर झाला की नाही याची चौकशी करण्यात यावी तसेच ज्या शाळांनी पालकांकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतले आहेत, त्या सर्व रकमांची परतफेड पालकांना करून द्यावी.
या गंभीर गैरव्यवहाराच्या विरोधात श्री. वाघचौडे सोमवार, दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment
0 Comments