वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
सावरोली सो (ता. शहापूर) : भक्ती, श्रध्दा आणि हरिनामाचा महामहोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 21 व्या अखंड नाम चिंतन सोहळ्याला साखरेश्वर मठ, गांगणवाडी येथे भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळत असून तिसऱ्या दिवशीही परिसरात दिवसभर भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
हरिनाम आणि हरिपाठाने मठ दुमदुमला
सोहळ्याची सुरुवात नेहमीप्रमाणे मंगल हरिपाठ, भजन आणि आरतीने होत आहे. गांगणवाडी, झापवाडी, वडाचीवाडी, बेलखडी, सावरोली सो, बेलकडी, नामपाडा, खरपत आदी गावांतून महिला भगिनी, पुरुष बांधव, तसेच लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
संध्याकाळी मठ परिसर हरिनामाच्या जयघोषाने उजळून निघतो.
दररोज 200 हून अधिक भाविकांची भक्तीमय हजेरी
तिसरा दिवस असल्याने भाविकांच्या संख्येतही भर पडली. दररोज 200 ते 250 भाविक नामस्मरणाचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित असतात. अनेक भक्त दरवर्षी प्रमाणे यंदाही या सोहळ्याचा अविभाज्य भाग बनले आहेत.
आलेखलेल्या भाविकांसाठी भोजन प्रसादाची मुबलक व्यवस्था
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भोजनप्रसादाची सेवा. मठात येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी संध्याकाळी प्रसादाची व्यवस्था असते.
“भोजनदान केल्याशिवाय कोणीही घरी जात नाही” ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने पाळली जात आहे. अनेक जण स्वखुशीने भोजनदानाचे पुण्य मिळवण्यासाठीही पुढाकार घेतात.
कीर्तनातून आध्यात्मिक ऊर्जा
भजन-आरतीनंतर सायंकाळी होत असलेल्या कीर्तनात मोठी गर्दी उसळते. कीर्तनकारांच्या ओजस्वी वाणीने भाविक मंत्रमुग्ध होतात. कीर्तन संपेपर्यंत परिसरात भक्तिरसाची अमृतधारा वाहत असते.
ग्रामस्थ मंडळाचा एक महिन्यांचा परिश्रम
हा सोहळा सुरळीत आणि भव्य होण्यासाठी गांगणवाडी ग्रामस्थ मंडळ गेल्या संपूर्ण महिन्यापासून तयारीत गुंतलेले होते.
मंडळातील तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकदिलाने कार्य केले असून, प्रकाशयोजना, स्वच्छता, भोजनव्यवस्था, निवासव्यवस्था, तसेच कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
परिसरातील प्रत्येक गावाचा सक्रिय सहभाग
सोहळ्यात गांगणवाडी, झापवाडी, वडाचीवाडी, बेलखडी, सावरोली सो, बेलकडी, नामपाडा, खरपत या गावांतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद व भक्तीची लहर पाहायला मिळत आहे.


Post a Comment
0 Comments