वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
शहापूर :दीपस्तंभ प्रतिष्ठान व पंचायत समिती शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षा सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडली. येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष प्रवेश परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा व खडतर असलेला हा प्रवास अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत शहापूर तालुक्यातील २५ परीक्षा केंद्रांवर शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गुणवत्तेचा ध्यास घेणारे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी सन्मा. श्री. हिराजी वेखंडे साहेब तसेच शिक्षणविस्ताराधिकारी शिवानी पवार मॅडम यांनी अस्नोली व नारायणगाव येथील परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
सदर परीक्षा यशस्वी होण्यासाठी संबंधित केंद्रांचे केंद्रप्रमुख, शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असल्याचे दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने नमूद करण्यात आले.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख व सहभागी विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ प्रतिष्ठानकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.




Post a Comment
0 Comments