वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक : मोहन दिपके .
खैरलांजी (ता. मोहाडी, जि. भंडारा) येथील बहुचर्चित दलित हत्याकांडातील आरोपींनी उर्वरित शिक्षा माफ करण्यासाठी शासनाकडे अर्ज केल्याची माहिती समोर येताच, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने तातडीची पाहणी करण्यात आली. राज्य महासचिव डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते, राज्य सचिव पी. एस. खंदारे, ॲड. नवनाथ भागवत (गिते), राजेश साळे, राजवीर वैभव गिते यांनी खैरलांजी गावात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
या वेळी खैरलांजी गावातील पोलीस पाटील तसेच बार्टी संस्थेचे मोहाडी तालुक्यातील समता दूत यांच्याकडून आरोपींची व प्रकरणाच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली. त्यानंतर भोतमांगे कुटुंबाच्या घराच्या जागेची पाहणी करण्यात आली. शेजारील नागरिकांनी त्या जागेवर गुरे बांधून अतिक्रमण केल्याचे आढळून आले असून ते तात्काळ काढून घेण्यात आले. घरातील विटा, माती, दगड, पत्रे आदी सर्व साहित्य जातीयवादी मानसिकतेतून नष्ट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी फक्त एक लोखंडी पलंग शिल्लक असल्याचे दिसून आले.
ज्या ठिकाणी हे अमानुष हत्याकांड घडले, तसेच जिथे भोतमांगे कुटुंबीयांचे मृतदेह टाकण्यात आले होते, त्या स्थळांची पाहणी करण्यात आली. खैरलांजी गावाच्या चौकात, ग्रामपंचायतीसमोर तसेच सार्वजनिक पाण्याच्या आडाजवळही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थांबून परिस्थिती समजून घेतली. याच आडाजवळ भोतमांगे यांची हुशार मुलगी प्रियंका हिची जातीयवादी गुंडांकडून छेडछाड होत असल्याची माहिती समोर आली. सध्या हा पाण्याचा आड वापरासाठी बंद असल्याचे सांगण्यात आले.
वादाचे मूळ ठरलेल्या शेताची पाहणी केली असता, भैयालाल भोतमांगे यांच्या नातेवाईकांनी सदर शेती सुमारे वर्षभरापूर्वी विकल्याची माहिती मिळाली. तसेच गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रालाही भेट देण्यात आली. संपूर्ण गाव संघटनेच्या प्रतिनिधीकडे पाहत होते, मात्र कोणीही जवळ येण्याचे धाडस करत नसल्याचे चित्र दिसून आले.
यानंतर भैयालाल भोतमांगे व त्यांच्या कुटुंबीयांच्या समाधीस्थळी जाऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. भोतमांगे कुटुंबाला मिळवून दिलेली शासकीय जमीन शोधून पाहण्यात आली. पुढे भंडारा शहरात जाऊन पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांची भेट घेण्यात आली. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व शिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत देऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
खैरलांजी हत्याकांड 29 सप्टेंबर 2006 रोजी घडले. गावातीलच जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांनी एका दलित कुटुंबातील चार सदस्यांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेचे पडसाद विधिमंडळापासून संसदेत उमटले, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. राज्यभर आंदोलने झाली; अनेक भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झाले व काहींवर अमानुष लाठीहल्ले करण्यात आले.





Post a Comment
0 Comments