वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर : द जैन इंटरनेशनल स्कूल, शहानुरवाडी येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला वार्षिक गॅदरिंग कार्यक्रम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित असल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे दिलेल्या निवेदनाची दखल घेत शाळा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
दिनांक १ डिसेंबर रोजी जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे शाळा प्राचार्यांना निवेदन सादर करण्यात आले. ६ डिसेंबर हा भारतरत्न, संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने हा दिवस संपूर्ण देशभर अत्यंत आदराने, शोकमय वातावरणात पाळला जातो. अनेक विद्यार्थी, पालक तसेच नागरिक या दिवशी विविध आदरांजली कार्यक्रमात सहभागी होत असल्याने या दिवशी आनंदोत्सव टाळला जातो.
त्यामुळे शाळेचा गॅदरिंग कार्यक्रम पुढील योग्य तारखेस आयोजित करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून शाळेच्या प्राचार्या यांनी कमिटीशी चर्चा केली आणि कार्यक्रमाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय अधिकृतरित्या पक्षाला कळवला.
या प्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहर अध्यक्ष रणजीत मनोरे, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे, जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक, जिल्हा संघटक भीमराव गाडेकर, हन्नु नाना, कडुबा म्हस्के, बादशहा लखपती आदींच्या शिष्टमंडळाचा समावेश होता.


Post a Comment
0 Comments