वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
{संपादकीय}
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान समता फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने चैत्यभूमी, दादर येथे अनोखी संविधान साक्षर मोहीम राबविण्यात आली. संविधान आणि त्यातील अधिकार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाने उपस्थित अनुयायांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
फाउंडेशनकडून आयोजित या मोहिमेत ५०० हून अधिक संघटकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना संविधानिक अधिकार, कर्तव्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा देण्यात आला. तसेच संविधान आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न विचारून योग्य उत्तर देणाऱ्या अनुयायांना विशेष भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. यात संविधान प्रास्ताविकेची फ्रेम, बाबासाहेबांची सही असलेले पेन, तसेच संविधान पुस्तक यांचा समावेश होता.
गेल्या ६९ वर्षांत महापरिनिर्वाण दिनी अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम होत असले तरी संविधान समता फाउंडेशनची संविधान साक्षर मोहीम ही पहिलीच संविधान-जागृती केंद्रस्थानी ठेवणारी पुढाकारयुक्त संकल्पना ठरली. हा उपक्रम एकदिवसीय न ठेवता पुढील काळात सातत्याने राबवण्याचा मानस असल्याचे फाउंडेशनच्या संघटकांनी सांगितले.
आज देशात घडणाऱ्या विविध सामाजिक-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संविधानिक मूल्यांचे जतन, त्यांची जनजागृती आणि सामान्य नागरिक हा या देशाचा खरा मालक आहे याची जाणीव करून देणे हे अत्यंत आवश्यक असल्याचा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला. सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेत राबविलेला हा उपक्रम म्हणजे बाबासाहेबांना दिलेले खरे अभिवादन ठरले.




Post a Comment
0 Comments