Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हास्तरीय महिला धम्म मेळावा उत्साहात संपन्न; प्रा. अंजली आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

 

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शंकर गायकवाड

निंभोरा : भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथे भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व जिल्ह्याच्या वतीने आयोजित दोन दिवसीय महिला धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोप आणि भव्य 'जिल्हास्तरीय महिला धम्म मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला. २५ डिसेंबर रोजी महिला समता सैनिक दलाचे शिबिर, तर २६ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या या मेळाव्याला प्रा. अंजली आंबेडकर यांची प्रमुख उपस्थित होती.


कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर उपस्थितांनी सामुदायिक त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केले. मेळाव्याचे अध्यक्षपद भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा महिला अध्यक्षा प्रियंका अहिरे यांनी भूषवले, तर स्वागताध्यक्ष म्हणून सुमंगल अहिरे उपस्थित होत्या.


'स्त्री-पुरुष समानता हीच धम्माची शिकवण' - प्रा. अंजली आंबेडकर.

मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या की, "भारतीय राज्यघटनेने आणि धम्माने महिला व पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. समाजात दोघांनाही एकसमान पातळीवर मोजले पाहिजे. महिलांनी आता कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता, धम्म आणि संविधानाच्या जोरावर प्रगती करावी." त्यांच्या या प्रेरणादायी भाषणामुळे उपस्थित महिलांमध्ये नवा उत्साह संचारला होता.


उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव

यावेळी २०२५ या वर्षभरात महिला धम्म प्रशिक्षण आणि समता सैनिक दल शिबिरांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या तालुक्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये:


प्रथम क्रमांक: मुक्ताईनगर तालुका

द्वितीय क्रमांक: बोदवड तालुका

तृतीय क्रमांक: जामनेर तालुका


तसेच भुसावळ, जळगाव आणि रावेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. यासोबतच समता सैनिक दलाच्या प्रशिक्षक लेफ्टनंट कर्नल मीना झिने (जालना) आणि लेफ्टनंट कर्नल रमेश साळवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


या सोहळ्याला राज्य संघटक लता तायडे, के. वाय. सुरवाडे, वैशाली सरदार, सुशीलकुमार हिवाळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शमिबा पाटील, एन.टी. इंगळे, मंगला सोनवणे यांसह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली सरदार यांनी केले, तर सूत्रसंचालन सुशीलकुमार हिवाळे यांनी केले.


हा मेळावा यशस्वी करण्यासाठी माता रमाई ग्रुप, बौद्धजन परिषद, त्रिरत्न बुद्ध विहार (निंभोरा) आणि निंभोरा येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा शेवट संजीवकुमार साळवे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील महिला संघटन अधिक मजबूत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



Post a Comment

0 Comments