वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
फुलंब्री (ता. प्रतिनिधी) – फुलंब्री तालुक्यात अंमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३१ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली असून, गांजाची तस्करी कोणासाठी व कुठे नेली जात होती, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. फुलंब्री तालुक्यातील हॉटेल तोरणा परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. तपासणीदरम्यान संबंधितांकडे मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून ३१ किलो गांजा जप्त केला असून, त्याची बाजारभावानुसार किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश असल्याने या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
या कारवाईनंतर आरोपींविरोधात एनडीपीएस (अंमली पदार्थ प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा कुठून आणला गेला, यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, तसेच यापूर्वी अशा प्रकारच्या तस्करीत आरोपी सहभागी होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
फुलंब्री तालुक्यात अंमली पदार्थांचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, अशा बेकायदेशीर व्यवसायावर पुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


Post a Comment
0 Comments