वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २४ — माथाडी कामगार कायदा तसेच इतर कामगार कल्याणविषयक कायदे व योजनांची प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच या कारवाईचा सविस्तर अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या जिल्हास्तरीय कृती समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला जिल्हा कामगार अधिकारी सुरेंद्रसिंग राजपूत, वखार महामंडळाचे प्रतिनिधी अंकुश भाटेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक के. एस. पवार यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुभाष लोमटे, शेख हारुन, संतोष तळेकर आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध आस्थापनांमध्ये कामगारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या वेतनावरील लेव्ही वेळेत माथाडी कामगार मंडळाकडे जमा न करणे, कामगारांच्या नियुक्ती प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या अडचणी, तसेच कामगारांना वेळेवर वेतन न दिल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विविध समस्या व मागण्या मांडल्या.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले की, वखार महामंडळांसह सर्व संबंधित आस्थापनांनी माथाडी कायद्याच्या तरतुदींनुसारच कामकाज करणे बंधनकारक आहे. कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन, सुविधा व अन्य लाभ वेळेत मिळावेत, हाच मंडळाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कामगार हिताच्या कायद्यांची जाणीवपूर्वक अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच या कारवाईची माहिती आणि कामगार संघटनांच्या वैध मागण्यांबाबत झालेल्या कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी सादर करावा, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.


Post a Comment
0 Comments