Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा ठाम निर्धार

 

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

लातूर, दि: 24- नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय यशानंतर वंचित बहुजन आघाडीने आता लातूर महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण संवाद बैठक पार पडली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा ठाम निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

नगरपरिषद निवडणुकीतील यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून हा उत्साह महानगरपालिका निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रत्येक प्रभागात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर देत, स्थानिक प्रश्नांच्या आधारे निवडणूक लढवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

बैठकीला वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे, जिल्हा निरीक्षक शुद्धोधन सावंत, महासचिव रमेश गायकवाड, लातूर जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, जिल्हा महासचिव रोहित सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड, युवा महासचिव रमेश माने, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, शहर महासचिव आकाश इंगळे, महिला शहराध्यक्ष सुजाता अजनिकर यांच्यासह शहर व जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संवाद बैठकीत लातूर शहरातील पाणीपुरवठा, खराब रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, स्वच्छता आणि नागरी मूलभूत प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. वंचित, उपेक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांना सत्तेच्या निर्णयप्रक्रियेत थेट सहभाग मिळावा, यासाठी महानगरपालिका निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे मत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments