वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
मुंबई : देशात सध्या केवळ धर्माचे राजकारण सुरू नाही, तर धर्माच्या नावाखाली पुरोगामी विचारधारा आणि त्या विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना संपवण्याचे सुनियोजित कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, हे कारस्थान वेळेत ओळखता आले नाही, तर समाजातील शोषित, वंचित, बहुजन तसेच संविधानवादी विचारसरणीचे लोक त्याचे थेट बळी ठरतील. धर्माचा वापर हा लोकांना विभागण्यासाठी, भीती निर्माण करण्यासाठी आणि लोकशाही मूल्ये कमकुवत करण्यासाठी केला जात आहे, ही बाब अत्यंत धोकादायक आहे.
ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पुरोगामी विचार म्हणजे संविधान, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा पुरस्कार करणारी विचारधारा आहे. मात्र, हीच विचारधारा संपवण्यासाठी काही शक्ती धर्माचा मुखवटा घालून समाजात द्वेष, हिंसा आणि अंधश्रद्धा पसरवत आहेत.
देशातील तरुण, शेतकरी, कामगार, महिला आणि दलित-आदिवासी समाजाने सजग राहण्याची गरज असून, संविधानाचे रक्षण करण्यासाठी संघटितपणे लढा उभारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. लोकशाही वाचवण्यासाठी विचारांची लढाई लढावी लागेल आणि सत्य, विवेक व वैज्ञानिक दृष्टिकोन यांची कास धरली पाहिजे, असेही ते म्हणाले.
धर्म हा व्यक्तिगत आस्थेचा विषय असून तो राजकारणासाठी वापरणे हे देशाच्या एकतेस आणि सामाजिक सलोख्यास घातक आहे, असे मत व्यक्त करत ॲड. आंबेडकर यांनी संविधानविरोधी शक्तींविरोधात वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments