वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मोहन दिपके
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आरोग्याविषयी अचूक माहिती मिळावी तसेच खतांचा समतोल व योग्य वापर करता यावा, या उद्देशाने ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कार्यालयातील आत्मा सभागृहात विशेष प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, नेक्स्ट जेन ऍग्रो कंपनीचे निलेश राऊत तसेच तंत्रसहाय्यक राजेश मुलगीर, संदीप कावडे उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात निवड झालेल्या 15 कंपन्या व वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आज शुक्रवार (दि. 26) रोजी हे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान मृद नमुना संकलनाची योग्य पद्धत, प्रयोगशाळेची रचना व आवश्यक उपकरणे, मृद परीक्षण प्रक्रिया तसेच अहवाल तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन तांत्रिक तज्ञ निखिल शिरोळे यांनी केले.
प्रशिक्षणामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळून ग्राम पातळीवर मृद चाचणी सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन स्मार्टचे नोडल अधिकारी तथा आत्माचे उपप्रकल्प संचालक गोविंद बंटेवाड यांनी केले.
या कार्यक्रमास निवड झालेले लाभार्थी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे शाश्वत शेतीला चालना मिळून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments