वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात येत आहे. मात्र घरकुल मंजूर झाल्यानंतर मिळणारा पहिला हप्ता केवळ १५ हजार रुपये असल्याने तो बांधकामासाठी अत्यंत अपुरा पडत असल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पहिला हप्ता किमान ७० हजार रुपये देण्यात यावा, अशी ठाम मागणी सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांनी शासनाकडे केली आहे.
घरकुल बांधकाम सुरू करताना ग्रेट डबर, रेती, लोखंड, सिमेंट यांसारख्या साहित्याची तात्काळ गरज भासते. मात्र सध्याच्या वाढलेल्या बांधकाम खर्चाच्या पार्श्वभूमीवर १५ हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यातून काम सुरू करणे लाभार्थ्यांना शक्य होत नाही. परिणामी अनेक ठिकाणी घरकुलांचे बांधकाम रखडले असून, काम सुरू होण्यास मोठा विलंब होत आहे.
पंतप्रधान आवास योजना, सेब्री योजना, रमाई आवास योजना यांसह अनेक घरकुल योजनांमध्ये सध्या पहिला हप्ता फक्त १५ हजार रुपये दिला जातो. हा निधी अपुरा असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन पहिलाच हप्ता वाढवून थेट ७० हजार रुपये द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
घरकुल योजना ही गरीब व गरजू नागरिकांच्या हक्काची योजना असून, योग्य वेळी पुरेसा निधी उपलब्ध झाल्यासच बांधकाम वेळेत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून पहिला हप्ता वाढवावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments