वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेने नाशिक जिल्ह्यात आपले खाते उघडले असून इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक ७ मधून अतिश मनोहर, प्रभाग क्रमांक ८ मधून मालन नंदू गवळे तर प्रभाग क्रमांक ९ मधून प्रशांत भडांगे यांनी विजय मिळवला. या यशानंतर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. “आनंदराज आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
रिपब्लिकन सेनेने या निवडणुकीसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी तीन उमेदवार विजयी झाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून संपूर्ण इगतपुरी शहर पिंजून काढले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील जनतेने आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून हा निकाल त्याचेच द्योतक आहे, असे अविनाश शिंदे यांनी सांगितले. येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार विजयी करण्यासाठी पक्षाची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारीसाठी पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज आले असून छाननीनंतर लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.
यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय साबळे, महाराष्ट्र नेते जिल्हा प्रभारी अडवोकेट विनय कटारे, विक्रम जगताप, महानगर प्रमुख डॉ.अनिल आठवले, युवक जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, जिल्हा उपाध्यक्ष विवेक तांबे, महिला महासचिव कोमल पगारे, जि.कार्याध्यक्ष मारुती घोडेराव, महासचिव जितेश शार्दुल, जिल्हा सचिव आरिफ मंसूरी, शहर महासचिव संदीप काकळीज, तालुकाध्यक्ष विठ्ठल जगताप, किशोर भडांगे, लकी साळवे, गजेंद्र बर्वे, नंदू गवळी,रितेश गरुड,योगेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी इगतपुरीमध्ये उमेदवारांसाठी जाहीर सभा घेऊन इगतपुरीत राबवलेला ‘भीमशक्ती–शिवशक्ती’चा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून भविष्यात रिपब्लिकन सेनेची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments