शहापूर | प्रतिनिधी
शंकर गायकवाड
शहापूर येथील शासकीय आश्रमशाळा व परिसरातील विद्यार्थ्यांना ये–जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शहापूर–टाकीपार मार्गावर नियमित बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर शहापूर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने आगार व्यवस्थापक, शहापूर (एसटी महामंडळ) यांच्याकडे लेखी निवेदन देऊन विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, आदिवासी व ग्रामीण भागातील असून त्यांना दररोज शाळेत पोहोचण्यासाठी खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. यामुळे आर्थिक भार वाढत असून काही विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थितीही बाधित होत आहे.
शहापूर–टाकीपार मार्गावर सकाळी सुमारे १०.०० वाजता व दुपारी १०.३० वाजता विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार एसटी बससेवा सुरू करून ती मोफत अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, नियमित व परवडणारी वाहतूक सुविधा मिळेल, तसेच गळती थांबण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर मागणीकडे एसटी महामंडळाने सकारात्मक दृष्टीने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पालक व शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments