वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
मुरबाड -नांदगाव फाटा ते नांदगाव गावापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या एक वर्षापासून अतिशय खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, हा रस्ता नेमका रस्ता आहे की खड्ड्यांची मालिका, असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रवासी नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर संबंधित विभागाकडून खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येते. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या पंधरा दिवसांतच पुन्हा खड्डे जैसे थे होतात. त्यामुळे प्रशासन केवळ तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होते. चिखल, पाणी साचणे आणि खोल खड्ड्यांमुळे वाहनधारक, शाळकरी विद्यार्थी, रुग्ण व दैनंदिन प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अपघाताचीही भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर नांदगाव फाटा ते नांदगाव रस्त्याचे तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती काम हाती घ्यावे तसेच दर्जेदार साहित्य वापरून रस्ता पूर्णपणे नव्याने करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार की नागरिकांचा त्रास असाच सुरू राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



Post a Comment
0 Comments