Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजदिन निधी संकलनाला प्रारंभ.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

सोशल मीडिया संपादक : मोहन दीपके

हिंगोली : देशाच्या सीमांचे रक्षण करताना सैनिकांनी दाखवलेले शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलनाला आज जिल्हाधिकारी कार्यालयात औपचारिक सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सैनिकांच्या तसेच माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.


जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, निवासी उपजिल्हाधिकारी व सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत देखील सैनिक अविरतपणे देशसेवा करत असतात. त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी महत्त्वाचा आहे. यंदा 31 लाख रुपये उद्दिष्ट असताना जिल्ह्याने 41 लाख रुपये संकलन करून 133 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षीही राज्यात सर्वाधिक निधी संकलन करणारा जिल्हा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी सैनिक व त्यांच्या परिवारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सैनिकांच्या शौर्याची प्रशंसा करत प्रशासनाने केलेल्या यशस्वी निधी संकलनाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील, असे त्यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी व सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी कार्य करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करत हिंगोली जिल्ह्याने केलेल्या 133 टक्के निधी संकलनाचे कौतुक केले. आगामी वर्षाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शहीद सैनिक गणपत भिकाजी रणवीर यांच्या मातेस साडी—चोळी भेट देऊन गौरव करण्यात आला. तसेच ध्वजदिन निधीसाठी निवृत्तीवेतन दान करणाऱ्या सरस्वती बैरागी, तसेच माजी सैनिक चंपतराव कदम, मारोतराव टाक आणि सय्यद मीर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर इंगोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन तुकाराम मुकाडे यांनी केले. या कार्यक्रमास वीर माता-पिता, माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




Post a Comment

0 Comments