वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
महाराष्ट्र राज्याने शेती क्षेत्रात सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर करीत देशात आघाडी घेतली असून ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत राज्याने अभूतपूर्व असा विश्वविक्रम नोंदविला आहे. महावितरणने केवळ एका महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषी पंप बसवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपली नोंद करून घेतली आहे. या विक्रमाचा विशेष सोहळा शेंद्रा एमआयडीसी येथील ऑरिक सिटी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यास गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे निरीक्षक कार्ल सॅबेले विशेष उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राने केलेल्या या विक्रमाची घोषणा करत महावितरणला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले. अत्यावश्यक असलेल्या ३५ हजार पंपांच्या तुलनेत ४५ हजार ९११ पंपांची यशस्वी उभारणी ही मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे इमाव व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे, आ. प्रशांत बंब, आ. सुरेश धस, तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महावितरणचे संचालक मंडळ, उद्योग क्षेत्रातील मान्यवर व अभिनेते संदीप पाठक व योगेश शिरसाट उपस्थित होते.
सौर पंपांचे डिजिटल लोकार्पण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील नव्या सौर कृषी पंपांचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी दुरदर्शन प्रणालीद्वारे संवाद साधला. महावितरण आणि AIIM बँक यांच्यातील अर्थसहाय्य करारावरही या वेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
महाराष्ट्र थांबणार नाही – फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध व्हावी ही शेतकऱ्यांची जुनी मागणी होती. सौर फिडरमुळे ही मागणी पूर्ण होत आहे. राज्यात ‘कुसूम’ योजनेअंतर्गत आतापर्यंत ७ लाख सौर पंप बसविण्यात आले आहेत. पुढील वर्षभरात ही संख्या १० लाखांवर पोहोचवण्याचा सरकारचा संकल्प आहे.”
१६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता
सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे राज्याला स्वतंत्र १६ हजार मेगावॅट पर्यंत वीज निर्मितीची क्षमता निर्माण होणार आहे. प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चातील वीज निर्मितीमुळे उद्योग व घरगुती वापरातील वीजदर दरवर्षी ३ टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
ऊर्जाक्षेत्राला नवा रोजगार
सौर प्रकल्पांच्या वाढलेल्या मागणीमुळे उपकरण निर्मिती, देखभाल व स्थापना क्षेत्रात जवळपास १ लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मराठवाड्याची आघाडी
योजनेच्या अंमलबजावणीत मराठवाड्याने विशेष आघाडी घेतली असून केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच १४ हजार सौर पंप बसविण्यात आले आहेत. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना, नदीजोड प्रकल्प व अन्य उपाययोजनांमुळे शेती क्षेत्र अधिक शाश्वत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकेश चंद्रा यांनी केले. नीता पानसरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नीता पानसरे, आश्विनी दाशरथे व प्रेषित रुद्रावतार यांनी केले.




Post a Comment
0 Comments