वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शहापूर तालुका प्रतिनिधी :शंकर गायकवाड
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन (हर घर जल योजना) अंतर्गत शहापूर तालुक्यातील अनेक गावांसाठी पाणीपुरवठा योजना दीड वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आली. सुरुवातीला काही ग्रामपंचायतींमध्ये पाईपलाईन टाकणे, नळ कनेक्शन देणे तसेच पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू झाले. मात्र आजही तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ही योजना अपूर्ण अवस्थेत असून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
स्थानिक ग्रामस्थांनी ठेकेदारांशी संपर्क साधल्यास “पेमेंट मिळाले नाही”, “काम सुरू आहे, लवकरच योजना कार्यान्वित करू” अशीच उत्तरे वारंवार दिली जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आलेले साहित्य धुळखात पडले असून कामे रखडलेलीच आहेत.
विशेष म्हणजे, शहापूर तालुक्यातील धरणांमधून मुंबई महानगराला पाणीपुरवठा केला जात असताना, याच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आजही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या योजनेमुळे घरासमोर नळाद्वारे पाणी मिळेल, महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरून जाईल, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र दीड वर्ष उलटूनही ही आशा अपूर्णच राहिली आहे.
जानेवारीनंतर पाणीटंचाई अधिक तीव्र होते, त्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालून जल जीवन मिशनची कामे पूर्ण करावीत व गावकऱ्यांना लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी शहापूर तालुक्यातील ग्रामस्थ व महिलांकडून करण्यात येत आहे.



Post a Comment
0 Comments