![]() |
| सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी |
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
{संपादकीय}
पुणे, दि. २६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी परस्पर समन्वय साधून सोहळा हा यशस्वी करावा. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.
हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसरास भेट देऊन १ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, समाजकल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक संदीप गिल, पुणे शहरचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, उत्पादक शुल्क अधीक्षक अतुल कानडे, समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, गट विकास अधिकारी शेखर शेलार, बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड , प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, महंमद शेख, रामदास लोखंडे तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. कांबळे म्हणाले की, देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पेरणे फाटा येथे येतात. यंदा गेल्या वर्षीपेक्षा विविध कारणांनी वाढणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन अनुयायांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या मागण्यांबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे प्राप्त प्रस्तावांना आजच मान्यता देण्यात येईल. आणखी काही मागण्या असल्यास तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही डॉ. कांबळे यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास दिलेल्या भेटीला सन २०२७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत असून, या पार्श्वभूमीवर भविष्यात येणाऱ्या अनुयायांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने आतापासूनच दीर्घकालीन पूर्वतयारी करावी, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत संबंधित विभागांकडून करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये विजयस्तंभ सजावट, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, औषध साठा, रुग्णालयांतील खाटांचे आरक्षण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे टँकर, घंटागाडी, हिरकणी कक्ष, बसेसचे नियोजन, विद्युत व्यवस्था, पुस्तक विक्री स्टॉल, शौचालये, वाहनतळ, रस्ते दुरुस्ती, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, आपत्कालीन प्रतिसाद, समाजमाध्यमांचे सनियंत्रण, नियंत्रण कक्ष, बिबट व सर्प प्राणी व्यवस्थापन तसेच आवश्यक मनुष्यबळ आदींचा समावेश आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करत ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सामाजिक न्याय मंत्री यांना कळविण्यात येईल, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.




Post a Comment
0 Comments