वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
मुंबई : राज्यातील शेतकरी संकटाचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. कर्जफेडीसाठी एका शेतकऱ्याला थेट स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. या धक्कादायक घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत संताप व्यक्त केला आहे.
गेल्या सहा महिन्यांत राज्यात तब्बल ७८१ शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याची आकडेवारी त्यांनी पुढे मांडली. अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाली असताना सरकारकडून ना ठोस मदत मिळाली, ना संपूर्ण कर्जमाफी—असा आरोप त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“शेतकऱ्यांनी आता जात-धर्माच्या आधारे नव्हे, तर आपल्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. मतदानाचा पॅटर्न बदलण्याची हीच वेळ आहे,” असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले.
घटना नेमकी काय?
मिंथुर येथील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांच्याकडे चार एकर शेती आहे. निसर्गाच्या प्रतिकूलतेमुळे शेतीतून उत्पन्न घटले. कुटुंब चालवण्यासाठी त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये कर्ज घेतले. मात्र, दुर्दैवाने विकत घेतलेल्या गाई दगावल्या आणि शेतीही फसली. परिणामी कर्जाचा डोंगर वाढत गेला.
या एक लाख रुपयांवर सावकारांकडून दिवसाला दहा हजार रुपये इतके अवाजवी व्याज आकारले गेले. काही काळातच कर्जाची रक्कम कोट्यवधींच्या दिशेने झुकत ७४ लाखांपर्यंत पोहोचली. तगादा वाढल्यानंतर कुडे यांनी दोन एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील साहित्य विकले; तरीही कर्ज फिटले नाही.
शेवटी, एजंटच्या माध्यमातून त्यांना कोलकातामार्गे कंबोडियाला नेण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करून त्यांची एक किडनी विकण्यात आली. या व्यवहारातून मिळालेल्या सुमारे आठ लाख रुपयांतून काही कर्ज फेडले गेले; मात्र संपूर्ण देणी आजही शिल्लक असल्याचे कुडे सांगतात.
प्रशासनाची भूमिका संशयात
न्यायासाठी कुडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. सावकारांच्या दहशतीपुढे प्रशासन निष्क्रिय आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“मी सर्वस्व गमावले आहे. किडनी विकूनही तगादा थांबलेला नाही. न्याय न मिळाल्यास मी कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करेन,” असा टाहो रोशन कुडे यांनी व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments