वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मनोहर गायकवाड
दिवा: घराबाहेर खेळताना कुत्र्याने चावलेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा महिनाभर सुरू असलेला मृत्यूशी संघर्ष अखेर संपला. निशा शिंदे (वय ५) हिचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे दिवा परिसरात शोककळा पसरली आहे.
दिवा पूर्वेकडील बेडेकर नगर, दिवा–आगासन रोड परिसरात १७ नोव्हेंबर रोजी निशा घरासमोर खेळत असताना कठड्यावर बसली होती. त्याचवेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्या खांद्याला चावा घेतला. रक्तबंबाळ अवस्थेत पालकांनी तिला तातडीने कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तात्काळ रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देत उपचार सुरू केले.
दरम्यान, ३ डिसेंबर रोजी निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी तिची प्रकृती स्थिर असल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला होता. मात्र, १६ डिसेंबर रोजी उपचाराचा शेवटचा डोस दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली. रेबीजची लक्षणे तीव्र होत गेली आणि ती स्वतःच्याच शरीराला चावे घेऊ लागल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात हलवले.
चार दिवस रुग्णालयात तिच्यावर कसून उपचार सुरू होते. मात्र, दिवसेंदिवस तिची प्रकृती अधिकच बिघडत गेली. अखेर २१ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निशाने प्राण सोडले. चिमुकलीची अशी अवस्था पाहून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, वेळेत आणि योग्य उपचार न मिळाल्याने आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचे मामा समाधान कदम यांनी केला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी, “या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे. चौकशीतून वस्तुस्थिती समोर यावी,” अशी मागणी केली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, रेबीज प्रतिबंधक उपाययोजना आणि आरोग्य यंत्रणेची तत्परता यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


Post a Comment
0 Comments