प्रतिनिधी शंकर गायकवाड
कल्याण - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, वंचित बहुजन आघाडीने बहुजन समाज पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रभाग क्रमांक २ मधील बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकभाऊ वानखडे, ममता दिपक वानखडे आणि मंगेश मोतीराम ओहळ यांना एकसंघ पाठिंबा देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
या संदर्भात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशालजी पावसे यांनी स्पष्टपणे सांगितले की, बहुजन समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि वंचित घटकांच्या सशक्तीकरणासाठी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार कटिबद्ध आहेत. त्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या ‘हत्ती’ या निवडणूक चिन्हासमोर बटण दाबून उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
विशालजी पावसे पुढे म्हणाले की, बहुजन समाज एकत्र आला तर परिवर्तन अटळ आहे. अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष यांची विचारधारा समान असून, ही लढाई केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, ती बहुजन समाजाच्या स्वाभिमानाची आणि हक्कांची लढाई आहे.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही या जाहीर पाठिंब्याचे स्वागत करत, प्रभाग क्रमांक २ मध्ये बहुजन विचारधारेचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात संयुक्त प्रचार, मतदार संपर्क आणि जनजागृती मोहिमा राबवून मतदारांपर्यंत बहुजन समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रभाग क्रमांक २ मध्ये हा जाहीर पाठिंबा राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार असून, बहुजन समाजातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment
0 Comments