वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
ठाणे | संपादकीय
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी ठाण्यातील एका नामांकित खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
महापालिका निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रांवरील कामकाजासाठी शासकीय, निमशासकीय तसेच खासगी शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक विभागाचे कर्मचारी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल स्कूल येथे नियुक्ती आदेश बजावण्यासाठी गेले असता शाळेच्या मुख्याध्यापिका विमलेश सिंधू यांनी आदेश स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
यानंतर दुसऱ्यांदाही अधिकृतरित्या आदेश देण्यात आले, मात्र तरीही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. इतकेच नव्हे तर ठाणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली नोटीस स्वीकारण्यासही शाळा प्रशासनाने नकार दिला.
निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणे हे कायद्याने बंधनकारक असून मतदान प्रक्रिया ही प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या कर्तव्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ठाणे महापालिका निवडणूक विभागाने संबंधित शाळा व मुख्याध्यापिकेविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 व इतर अनुषंगिक कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments