Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*पतंग उडतोय औरंगाबादमध्ये, पण दोर दिल्लीत नाही—थेट फडणवीसांच्या हातात! सुजात आंबेडकरांचा स्फोटक आरोप*

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

प्रतिनिधी -मनोहर गायकवाड

औरंगाबादमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम रंगू लागला असून, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याने शहराचे राजकीय वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या सभांमधून त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर एकाच वेळी जोरदार हल्लाबोल केला.

“ज्यांनी महापालिकेची तिजोरी रिकामी केली, जनतेचा विश्वास लुटला, अशा शक्तींना आता सत्तेच्या बाहेर फेकण्याची वेळ आली आहे,” अशा ठाम शब्दांत सुजात आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली.


एमआयएमवर टीका करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “एमआयएममध्ये तिकीट म्हणजे व्यवहार झाला आहे. पैसे देऊन नगरसेवक बनलेला व्यक्ती सेवा करत नाही, तर आधी गुंतवणूक वसूल करतो.”

भाजपची भीती दाखवून मते मागायची आणि नंतर सत्तेसाठी त्यांच्याशीच हातमिळवणी करायची, ही एमआयएमची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.


“एमआयएमचे चिन्ह पतंग आहे, पण त्या पतंगाची दोर देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. फडणवीस ज्या दिशेला ओढतात, त्या दिशेलाच इम्तियाज जलील वळतात,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडवून दिली.


इम्तियाज जलील यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सुजात आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

“औरंगाबादच्या महिलांनी ५०० रुपयांत मते विकली, असे म्हणणे म्हणजे संपूर्ण महिलावर्गाचा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही. महिलांचा स्वाभिमान जपण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला ताकद द्या,” असे आवाहन त्यांनी केले.


भीमनगर, भावसिंगपुरा व इतर भागांतील सभांमध्ये बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले.

“आमदार-खासदार मोठे वाटतात, पण रोजचे पाणी, वीज, रस्ते, शाळा, हॉस्पिटल—हे सर्व तुमचा नगरसेवक ठरवतो. त्यामुळे योग्य, प्रामाणिक नगरसेवक निवडणे अत्यंत गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.


इतर पक्षांतील तिकीट वाटपाच्या वादांवरही त्यांनी भाष्य केले.

“तिकीट कापल्याने गाड्या फोडल्या जात आहेत, मारामाऱ्या होत आहेत, अगदी आत्महत्येपर्यंत प्रकरणे जात आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीत असा गोंधळ नाही, कारण हा पक्ष तळागाळातील संघर्षातून उभा राहिलेल्या कार्यकर्त्यांचा आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.


शहरात ‘वंचित’ची लाट

गल्लीबोळांपासून वस्त्यांपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा वाढता प्रभाव दिसून येत असून, विशेषतः तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. यंदा औरंगाबादमध्ये मोठे सत्तांतर घडणार, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या सभेला जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, ॲड. रामेश्वर तायडे, राहुल मुगदल, सांडू श्रीखंडे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments