Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

महिलांना ‘बौद्धाचार्या’ करून संविधानातील समतेची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी – ॲड. एस. के. भंडारे

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

(प्रतिनिधी : शंकर गायकवाड)

नवी मुंबई : भारतीय संविधानाने मनुस्मृतीतील विषमता नष्ट करून स्त्री–पुरुष समानतेची स्पष्ट मांडणी केली आहे. मात्र आजही अनेक क्षेत्रांत महिलांना पुरुषांच्या बरोबरीने जबाबदारी व अधिकार दिले जात नाहीत. ही दरी दूर करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा महिलांना ‘श्रामणेरी–बौद्धाचार्या’ म्हणून घडवत असून, त्यांना बौद्ध धार्मिक विधी करण्याचे अधिकार देत आहे. हा उपक्रम म्हणजे तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील सामाजिक समतेची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे यांनी केले.


नवी मुंबई जिल्हा महिला शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त वाशी येथील ‘बुद्ध प्रतिष्ठान’ येथे आयोजित तिसऱ्या श्रामणेरी–बौद्धाचार्या धम्म प्रशिक्षण व उपासिका शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


महिला सक्षमीकरणाचे नवे पाऊल

ॲड. भंडारे यांनी सांगितले की, १५ ऑगस्ट २०२३ पासून भारतीय बौद्ध महासभेच्या पुरुष व महिला जिल्हा कार्यकारिण्या स्वतंत्र करण्यात आल्या आहेत. महिलांच्या वाढत्या मागणीनुसार धम्म विधींचे प्रशिक्षण देण्यासाठी यापूर्वी चैत्यभूमी येथे दोन शिबिरे घेण्यात आली होती. नवी मुंबईत होत असलेले हे तिसरे शिबिर महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमा पवार यांनी शिबिरात सहभागी झालेल्या महिलांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे विशेष कौतुक केले. तसेच केंद्रीय उपप्रमुख रागिणी पवार आणि महाराष्ट्र राज्य महिला शाखेच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनीही उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षा शोभा कांबळे होत्या. बुद्ध प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अनंत हर्षवर्धन यांनी प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्याबद्दल ॲड. भंडारे यांनी विशेष प्रशंसा केली.


या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्रभरातून एकूण ३३ महिला शिबिरार्थी सहभागी झाल्या असून, त्यामध्ये नांदेड, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, रायगड, पालघर, धुळे, नाशिक, यवतमाळ आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. संघनायक पूज्य भिक्खुणी संयमित्रा थेरी यांनी शिबिरार्थींना श्रामणेरी प्रवज्जा देत धम्मनियमांची दीक्षा दिली.


या सोहळ्यास राज्य महिला शाखेच्या सरचिटणीस सुजाता कांबळे, स्वाती गायकवाड, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव जगताप, संजय झनके, छाया दिवे, वंदना कुरणे, विजय झनके, विनोद पाचपिंडे, चांदणी पाचपिंडे, दत्ताश्रय हराळ, मधुकर हिवराळे व अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस ज्योती जाधव यांनी केले. धनराज मनुरे यांनी शिबिरार्थींच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षा शोभा कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




Post a Comment

0 Comments