प्रतिनिधी- शंकर गायकवाड
लातूर ग्रामीण तालुक्यातील टाका येथील रहिवासी तथा नवोदय विद्यालय, लातूर येथील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असून, या घटनेच्या अनुषंगाने बाभळगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पीडित पाटोळे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली.
या भेटीदरम्यान अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यू संदर्भात कुटुंबीयांवर झालेल्या अन्यायाची, तसेच तपास प्रक्रियेत झालेल्या त्रुटींची सविस्तर माहिती कुटुंबीयांनी मा. प्रकाश आंबेडकर यांना दिली. कुटुंबीयांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले.
या दुर्दैवी घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका मा. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मांडली. त्यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करून मानसिक आधार दिला.
अनुष्का पाटोळे हिचा मृत्यू ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाला हादरवणारी घटना असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलता दाखवून कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच या प्रकरणात पीडित पाटोळे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास मा. प्रकाश आंबेडकर यांनी कुटुंबीयांना दिला. या भेटीमुळे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.


Post a Comment
0 Comments