Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*घरात फ्रीज आहे तर सावधान, मध्यरात्री स्फोट, गोरेगावमध्ये हृदयद्रावक दुर्घटना*

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

प्रतिनिधी : मनोहर गायकवाड

मुंबई | मुंबईतील गोरेगाव परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. घरात शांतपणे झोपलेल्या एका कुटुंबावर अचानक काळाचा घाला पडला. फ्रीजच्या जोरदार स्फोटानंतर लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तीन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब रात्रीचे जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास घरातील रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढा घातला आणि दाट धुराने घरात अडकलेल्या सदस्यांना श्वास घेणंही अशक्य झालं.

आगीचा वेग इतका प्रचंड होता की, झोपेत असलेल्या कुटुंबीयांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. धुरामुळे गुदमरून आणि आगीच्या ज्वाळांमध्ये सापडून तिघे गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी स्फोटाचा आवाज ऐकताच धाव घेतली आणि तातडीने अग्निशमन दल व पोलिसांना पाचारण केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आणि घरात अडकलेल्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात फ्रीजच्या कॉम्प्रेसरमधील बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमकं कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञांनी जुनी उपकरणे, खराब वायरिंग आणि सतत सुरू ठेवलेली यंत्रणा याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी व सर्व्हिसिंग करण्याचे आवाहन केले आहे.

एक साधा फ्रीजही कधी मृत्यूचे कारण ठरू शकतो, याची ही दुर्दैवी आणि धक्कादायक आठवण देणारी घटना ठरली आहे.



Post a Comment

0 Comments