वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : रितेश साबळे
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शहराच्या सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते भीमनगर, भावसिंगपुरा येथील सभेत या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास नवीन पाणीपुरवठा योजना तात्काळ मार्गी लावून औरंगाबाद शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये केजी टू पीपर्यंत मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा बळकटीकरण, स्वच्छता व्यवस्था सुधारणा, पायाभूत सुविधा विकास, महिला सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणा आणि ई-गव्हर्नन्सवर विशेष भर देण्यात येणार आहे.
या प्रसंगी औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार अमित सुधाकर भुईगळ, जरीना जावेद कुरेशी, करून मेघानंद जाधव, अफसर खान, यासीन खान हे उमेदवार यावेळी उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ, मेघानंद जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकृत उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक २०, इंदिरा नगर तसेच प्रभाग क्रमांक २३, विश्रांती नगर येथे भव्य प्रचार रॅल्या काढण्यात आल्या. या रॅलीनंतर घेण्यात आलेल्या कॉर्नर सभांमधून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. औरंगाबादच्या विकासासाठी परिवर्तन घडवून आणण्यासाठी व वंचित बहुजन आघाडीला एक संधी देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिल्याचे चित्र या प्रचार दौऱ्यात पाहायला मिळाले.




Post a Comment
0 Comments