वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी शंकर गायकवाड
पालघर : स्थलांतरित बांधकाम कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने पालघर जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी पालघर येथील जिल्हा परिषद शाळा आनंदाश्रम येथे बांधकाम मजुरांच्या १४ मुलांना औपचारिकरीत्या शाळेत दाखल करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय, स्पर्श फाऊंडेशन व शिक्षण विभाग, पालघर यांच्या संयुक्त पुढाकारातून स्थलांतरित कुटुंबांचे तात्काळ सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या आधारे बांधकाम कामगारांच्या मुलांना जवळच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल करून त्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश त्वरित उपलब्ध करून देण्यात आले.
माननीय जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड मॅडम व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माननीय सोनाली मातेकर उपस्थित होत्या. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास स्पर्श फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय निमिष मोहिते, बिट विस्तार अधिकारी नीलम पष्टे, केंद्रप्रमुख विनोद पाटील, बांधकाम मजूर पालक तसेच दाखल झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



Post a Comment
0 Comments