वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : रितेश साबळे
फरिदाबाद : फरिदाबादमध्ये एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, हा प्रकार थेट खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत घडल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी रुग्णवाहिकेवर चालक आणि सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपींनी रुग्णवाहिकेत बसवले. त्यानंतर तिच्याकडून ६०० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले, मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि वाहन लॉक करून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर काही दिवसांनी पीडितेने घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. दरम्यान, पीडितेचा एक कथित व्हिडीओ समोर आला असून, तो घटनेनंतर तयार करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या व्हिडीओच्या सत्यतेची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
तपासादरम्यान असेही निष्पन्न झाले आहे की, दोन्ही आरोपींपैकी एक उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी असून दुसरा झाशीचा आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल हरियाणा राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी फरिदाबादचे पोलीस आयुक्त सत्रेंद्र कुमार गुप्ता यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती आणि आतापर्यंत झालेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे खासगी रुग्णवाहिका सेवांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पुढील तपास पोलीस कसून करत आहेत.


Post a Comment
0 Comments