Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? प्रजासत्ताक दिनी सरकारी महिला कर्मचाऱ्याने मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारला; म्हणाली, “सस्पेंड केलं तरी चालेल, पण माफी मागणार नाही”

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

 प्रतिनिधी : मोहन दीपके

संपूर्ण देशात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, नाशिकमध्ये आयोजित शासकीय कार्यक्रमात एक वेगळीच घटना घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना, त्यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याचा आरोप करत वनविभागातील एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला.


ही महिला कर्मचारी माधवी जाधव असून त्या वनविभागात कार्यरत आहेत. त्यांच्या अचानक उद्रेकामुळे कार्यक्रमस्थळी काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले.


घटनेनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या, “ज्यांनी देशाला संविधान दिलं, लोकशाहीची पायाभरणी केली, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न घेणं ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.”


त्या पुढे म्हणाल्या, “मी मीडियाशी कोणतंही देणं-घेणं ठेवत नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी.”


“भाषणात बाबासाहेबांचं नाव येईल म्हणून मी शेवटपर्यंत वाट पाहत होते. पण लोकशाही आणि संविधानाशी थेट संबंध नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेतली गेली. मग प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी असलेल्या बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.


या घटनेनंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात झालेल्या या प्रकारामुळे विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.



Post a Comment

0 Comments