वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : मनोहर गायकवाड
कल्याण :लग्नघरात मंगलाष्टकांऐवजी रुग्णवाहिकांचे सायरन घुमल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणमधील हायप्रोफाइल समजल्या जाणाऱ्या मोहन प्राइड सोसायटीत आयोजित हळदी समारंभानंतर तब्बल ४० ते ५० पाहुण्यांना अन्नविषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा सर्वाधिक फटका वधूला बसला असून, नवरीसह तिची आई व बहिणीलाही विषबाधा झाली आहे. परिणामी नियोजित लग्न सोहळाच रद्द करण्याची वेळ कुटुंबावर आली.
मोहन प्राइड सोसायटीमध्ये काल हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी जेवण केल्यानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या, जुलाब व तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. समारंभ आटोपून घरी व निवासस्थानी परतलेल्या पाहुण्यांची प्रकृती अचानक बिघडू लागल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विषबाधा झालेल्या रुग्णांना तातडीने कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड येथील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत नवरीची प्रकृतीही गंभीररीत्या खालावल्याने तिच्यावर सध्या उपचार सुरू असून, या घटनेमुळे तिला मोठा मानसिक धक्का बसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या अन्नविषबाधेच्या घटनेमुळे वधूच्या कुटुंबाला लग्न सोहळा रद्द करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. या प्रकरणी वधूच्या वडिलांनी संबंधित कॅटर्सविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
लग्नासारखा आनंदाचा क्षण अन्नविषबाधेमुळे शोकांतिकेत रूपांतरित झाल्याने, कॅटरिंग सेवा व समारंभातील अन्नसुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Post a Comment
0 Comments