वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : मनोहर गायकवाड
पुणे : औंध येथील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या गंभीर हलगर्जीपणामुळे ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर चुकीचे निदान करून पित्ताचे उपचार करण्यात आले आणि त्याला घरी पाठवण्यात आले. मात्र अवघ्या दोन तासांतच त्याचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जुनी सांगवी येथील ममतानगर परिसरात राहणारा सुमीत श्रीकांत गद्रे (सोनावणे) याला रविवारी पहाटे सुमारे ३.४० वाजता छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात सुमीतची ईसीजी तपासणी करण्यात आली. मात्र ईसीजी अहवाल सामान्य असल्याचे सांगत डॉक्टरांनी त्याला हृदयविकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर केवळ पित्त, मळमळ व वेदनांवर औषधे देत वेदनाशामक इंजेक्शन लावून सुमीतला घरी पाठवण्यात आले.
उपचार करून घरी परतल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच सुमीत अचानक जमिनीवर कोसळला. घाबरलेल्या नातेवाईकांनी त्याला पुन्हा औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी सुमीतला मृत घोषित केले.
जर रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच योग्य निदान केले असते, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला असता किंवा सुमीतला तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला असता, तर त्याचा जीव वाचू शकला असता, असा आरोप नातेवाईक व आरोग्य कार्यकर्त्यांनी केला आहे.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी नातेवाईकांनी केली आहे. जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आरोग्य विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments