वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
ठाणे जिल्हा संपादक - शंकर गायकवाड
आसनगाव (पू.) : देशाच्या सामाजिक व संविधानिक परिवर्तनाला निर्णायक दिशा देणाऱ्या १ जानेवारी १८१८ च्या ऐतिहासिक भीमा कोरेगाव युद्धातील शूरवीर शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०८ वा शौर्यदिन विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आसनगाव पूर्व येथे प्रतिष्ठानच्या वतीने अत्यंत उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुसूत्र रूपरेषा ठरविण्यात सामाजिक कार्यकर्ते श्री. गजानन पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. सोहळ्यास मोठ्या संख्येने वरिष्ठ नागरिकांची उपस्थिती लाभली. मा. संदीप डोळस साहेब (चौकाचे निर्माते) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सकाळपासूनच चौकात प्रेरणादायी व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
मान्यवरांच्या हस्ते विजयस्तंभास हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामूहिक त्रिशरण–पंचशील घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यापूर्वी डिव्हिजनल सिव्हिल इंजिनिअर प्रभाकर जामनिक साहेब यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये जोश निर्माण झाला.
भीमा कोरेगावची लढाई ही कोणत्याही राजाच्या राज्यासाठी नव्हे, तर आत्मसन्मानासाठी लढली गेली. त्यामुळेच कमी संख्येतील सैनिक असूनही पेशव्यांचा पराभव झाला, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यानंतर उपस्थित जनसमुदायाच्या हस्ते मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. शेवटी विजयस्तंभास सलामी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Post a Comment
0 Comments