Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

प्रजासत्ताक दिनी औरंगाबाद हादरले : ‘लोकशाहीचा गळा आवळल्याचा’ आरोप करत आमदाराच्या पुतळ्याला प्रतीकात्मक फाशी

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

औरंगाबाद : भारतीय लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये घडलेल्या एका तीव्र आंदोलनाने राजकीय वातावरण तापले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिक व कार्यकर्त्यांनी भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला भरचौकात प्रतीकात्मक फाशी देत निषेध नोंदवला.


महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सकाळपासूनच वातावरण तणावपूर्ण होते. प्रभाग २४ मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. पैशांचे वाटप करून निवडणूक ‘मॅनेज’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, या कथित गैरप्रकारांसाठी भाजप आमदार नारायण कुचे जबाबदार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.


आंदोलनादरम्यान ईव्हीएम मशिनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. “लोकशाहीची हत्या होत आहे,” अशा घोषणा देत संतप्त नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पैशांच्या जोरावर निवडणूक यंत्रणा व निकालावर प्रभाव टाकण्यात आल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला.


“पैशांच्या बळावर लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींचा धिक्कार असो,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या निषेधाच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये नागरिकांनी आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रतीकात्मक फाशी देत आपला रोष व्यक्त केला.


वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जोपर्यंत निवडणुका पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होत नाहीत आणि बोगस मतदानाच्या आरोपांची सखोल चौकशी केली जात नाही, तोपर्यंत हा लढा थांबवला जाणार नाही.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाबाबत चर्चा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑडिओमध्ये एक व्यक्ती “आता नको, थोडा अंधार पडू द्या, मग पैसे वाटप करू,” असा सल्ला देताना ऐकू येते. यावर “पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो,” असे उत्तर दिल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



Post a Comment

0 Comments