वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये घडलेल्या एका गंभीर आणि धक्कादायक घटनेमुळे शहरातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका विद्यार्थिनीने आपल्या रूममेटचे कपडे बदलतानाचे फोटो व व्हिडीओ गुपचूप चित्रीत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही दृश्ये संबंधित विद्यार्थिनीने आपल्या ओळखीच्या युवकाला पाठविल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे.
प्रकरण इतक्यावरच थांबले नाही. सदर व्हिडीओ व फोटो बाहेर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित विद्यार्थिनीला मानसिक त्रास देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच तिने विरोध केल्यामुळे तिच्यावर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे हॉस्टेलमधील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पीडित विद्यार्थिनीने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनी व संबंधित युवकाविरोधात गोपनीयतेचा भंग, अश्लील चित्रीकरण, धमकी देणे व मारहाण यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून मोबाईल फोन व डिजिटल पुरावे तपासासाठी जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर एमजीएम कॉलेज प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा आणि देखरेख याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर नियम व उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, अशी मागणी पालक व विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकार अतिशय गंभीर मानला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments