Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

‘मिनी सरस प्रदर्शन 2026’ चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन


प्रतिनिधी -मोहन दिपके 

हिंगोली, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या वतीने आयोजित ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री – 2026’ चे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदान, हिंगोली येथे सुरू असलेले हे प्रदर्शन येत्या गुरुवार (दि. १९) पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम, आरसेटीचे संचालक बनसोडे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांना त्यांच्या कर्तृत्वाचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनात बचतगटांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण हस्तकला वस्तू तसेच इतर आकर्षक उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शनिवार व रविवारी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकुटुंब प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करावी आणि त्यांच्या उपजीविकेस हातभार लावावा, असे आवाहन प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी केले आहे.

प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments