प्रतिनिधी - मोहन दिपके
हिंगोली : राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आपल्या पथकासह हिंगोली शहरातील नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह येथे अचानक भेट देऊन पाहणी केली.
या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निवास, भोजन, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य व इतर सोयी-सुविधांबाबत सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थिनींकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रिया ऐकून त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी गोरक्ष लोखंडे यांनी सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे तसेच गृहपाल श्रीमती सुलोचना ढोणे यांच्या कार्याचे कौतुक करत वसतिगृहातील स्वच्छता, शिस्त व व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले.
तसेच उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत त्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे, शिस्तबद्ध राहण्याचे व शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेण्याचे आवाहन केले. आयोगाकडून विद्यार्थिनींच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.



Post a Comment
0 Comments