प्रतिनिधी-शंकर गायकवाड
अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी भगवान बुद्धांच्या धम्माचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे काळाची गरज आहे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्टा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक विजय चौरपगार यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे अमरावती विभागीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते.
धम्म तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर विभागनिहाय सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अकोल्यातील या बैठकीत अमरावती विभागातील जिल्हानिहाय संस्कार, संरक्षण, प्रचार-प्रसार आणि पर्यटन या विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या आगामी उपक्रमांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये या सभेत समाजातील जनजागृतीसाठी विविध शिबिरे राबवणे, ऐतिहासिक बुद्ध स्थळांच्या सहलींचे आयोजन करणे, 'गाव तेथे भारतीय बौद्ध महासभा' आणि 'समता सैनिक दल' स्थापन करणे आदी विषयांवर भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे संस्कार विभाग प्रमुख विजय कांबळे यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य संरक्षण उपाध्यक्ष व्ही.डी. हिवराळे, संस्कार विभाग सचिव रविंद्र गवई, राज्य संघटक भिमराव तायडे, जिल्ह्याचे अध्यक्ष पी.जे. वानखडे सर, सरचिटणीस नंदकुमार डोंगरे आणि कोषाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते. विशेष निमंत्रित म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्याचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनीही उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सभेला अमरावती (पूर्व/पश्चिम), अकोला, बुलढाणा (उत्तर/दक्षिण), यवतमाळ (पूर्व/पश्चिम), वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस नंदकुमार डोंगरे यांनी केले, तर प्रास्ताविक भीमराव तायडे यांनी मांडले. उपस्थितांचे आभार प्रकाश बोरकर यांनी मानले.



Post a Comment
0 Comments