Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

गाडगे_महाराज_जयंती ( 23 फेब्रुवारी ) स्वच्छता, सेवा व माणुसकी हा महामंत्र देऊन गावे उभारणारे संत गाडगे महाराज....

 


प्रतिनिधी - शंकर गायकवाड 

 "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" या भजनाचा गजर करत, हातात झाडू आणि खांद्यावर गाडगे घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वच्छतेची आणि समतेची ज्योत पेटवणारे व तर्क प्रबोधनातून विवेकाच्या खरट्याने डोक्यात भरलेली अंधश्रद्धा दूर करून माणसात नैतिकता पेरणारे थोर समाजसुधारक म्हणजेच गाडगे महाराज. राष्ट्रसंत गाडगे महाराज ( गाडगे बाबा ) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याचा अल्पसा आढावा.


 गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जाणोरकर होते. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक अन्यायाची चीड होती. संसारात मन न रमल्यामुळे त्यांनी जनसेवेचा मार्ग निवडला आणि ते खऱ्या अर्थाने 'गाडगे बाबा' झाले.


              कीर्तनातून विधायक समाजप्रबोधन करणारे महाराष्ट्राच्या मातीतील विदर्भ भूमीतील ते शेवटचे संत होत. गाडगे महाराजांची कीर्तने ही केवळ भक्तीची माध्यमे नव्हती, तर ते एक प्रकारचे 'सोशल ऑडिट' असायचे. ते आपल्या कीर्तनातून अतिशय साध्या पण प्रभावी भाषेत मानव हिताच्या उद्देशाने सामाजिक विषयांवर बोली भाषेत प्रहार करत: असतं....


◆ अंधश्रद्धा निर्मूलन: देवाला प्राण्यांचा बळी देण्याविरुद्ध त्यांनी कडाडून विरोध केला. निसर्गाची पूजा करा ( संरक्षण ) तरच निसर्ग तुम्हाला जगवेल. 


◆ स्वच्छता: "शरीर आणि परिसर स्वच्छ ठेवा, तरच देव प्रसन्न होईल," हा त्यांचा मूलमंत्र प्रबोधनात नेहमी असे.


◆ शिक्षण: गरिबांच्या मुलांनी शिकले पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक शाळा आणि वसतिगृहे उभारली.


◆ व्यसनमुक्ती: दारू आणि जुगारापायी उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना त्यांनी सावरले. सर्व समाजाचे आरोग्य निरोगी कसे राहील यासाठी त्यांनी नेहमी प्रबोधनाची धार तेवत ठेवली. 


 ◆ 'स्वच्छता' हाच धर्म. गाडगे बाबा एखाद्या गावात गेले की आधी स्वतः हातात झाडू घेऊन गाव साफ करायला सुरुवात करत. ते म्हणायचे, "जे चकाकते ते सोने नसते, पण जे स्वच्छ असते तिथेच देव असतो." त्यांच्या या कृतीशील सुधारणेमुळेच पुढे भारत सरकारने 'संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान' सुरू केले.


         महाराजांनी आयुष्यभर स्वतःसाठी काहीही साठवले नाही. लोकांनी दिलेली भिक्षा त्यांनी धर्मशाळा, दवाखाने आणि अनाथालये बांधण्यासाठी वापरली. त्यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना 'असा समाजसुधारक पुन्हा होणे नाही' अशा शब्दांत सन्मानित केले होते. ते एकप्रकारे दीनदलितांचे कैवारी च होते. 


विकसनशील नैतिक समाजाच्या साठी गाडगे महाराजांनी संबंध जगाला ( दशसूत्री ) बहाल केली.

१. भुकेलेल्यांना अन्न द्या.

२. तहानलेल्यांना पाणी द्या.

३. उघड्या-नागड्यांना वस्त्र द्या.

४. गरिबांना शिक्षण द्या.

५. अंध-अपंगांना मदत करा.

६. बेघरांना ओटा द्या.

७. मुक्या प्राण्यांना अभय द्या.

८. गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून द्या.

९. दुःखी व निराश लोकांना धीर द्या.

१०. सर्वांना मानवाचा धर्म शिकवा. 

 

                 आजच्या काळात जेव्हा आपण प्रदूषणाशी आणि सामाजिक विषमतेशी लढत आहोत, तेव्हा गाडगे महाराजांचे विचार अधिकच प्रासंगिक ठरतात. केवळ फोटोला हार न घालता, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि गरजूला मदत करणे हेच त्यांच्यासाठी खरे अभिवादन ठरेल. अशा या महान राष्ट्रसंताची जयंती ग्रामीण रुग्णालय टोकावडे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने साजरी करण्यात आली.



Post a Comment

0 Comments