Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

📰 महाड चवदार तळे सुशोभीकरणासाठी ५५ कोटींचा निधी; २० मार्च रोजी भूमिपूजन

प्रतिनिधी - शंकर गायकवाड 

महाड (रायगड) – चवदार तळे येथील ऐतिहासिक सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त २० मार्च २०२६ रोजी शासनस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, याच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत वर्धापन दिन सोहळा आणि भूमिपूजन कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे, सहसचिव सोमनाथ बागुल, सहायक आयुक्त सुनील जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तहसीलदार महेश शितोळे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत वर्धापन दिनानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

दरम्यान, महाड येथील ऐतिहासिक सत्याग्रहास १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर करून वर्षभर विविध कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) संघटनेच्या वतीने राज्य महासचिव डॉ. केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे करण्यात आली होती.


काही दिवसांपूर्वी बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांची महाड येथील राष्ट्रीय स्मारकात भेट घेऊन राज्य सचिव वैभव गिते, भाऊराव तायडे, संजय सोनवणे, गोविंद मोरे, आप्पा गायकवाड, जय माने आदींनी निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाची शासनाने गंभीर दखल घेत निधीची तरतूद केली असल्याचे सांगण्यात आले.


२० मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यामुळे महाड येथे राज्यभरातून अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.



Post a Comment

0 Comments