वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
जनुना गावात दिनांक २ फेब्रुवारी रोजी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने क्रीडा व शरीरसौष्ठव क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गावातील तरुणांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. क्रिकेट क्षेत्रात पारितोषिक मिळवणारे सोहेल शेख तसेच बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पारितोषिक पटकावणारे अजीम खान पठाण यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
आपल्या रोजच्या उदरनिर्वाहाचे काम सांभाळत, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या मेहनतीच्या जोरावर या दोघांनी आपल्या-आपल्या क्षेत्रात यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण जनुना गावाचा नावलौकिक वाढला असून, गावातील तरुणांसाठी ही एक प्रेरणादायी बाब ठरली आहे.
या प्रसंगी राजीक शेख सर यांनी सोहेल शेख व अजीम खान यांना त्यांच्या पुढील करिअर वाटचालीसाठी मार्गदर्शन करत, अधिक प्रगती कशी साधता येईल याबाबत मोलाचे विचार मांडले. मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सत्तार खान पठाण यांनी अजीम खान यांचा सत्कार केला, तर शेख आरिफ यांनी सोहेल शेख यांचा सत्कार केला. तसेच मोहम्मद सादिक यांनी दोघांनाही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास आरिफ शेख, शेख माहीन, शेख फरहान, आबिद हाफिज, शेख शरीफ, शेख शाकीर, शेख रफिक, अमान खान, आबेद खान, शेख शहाबाज यांच्यासह समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते.
जनुना गावाचे तसेच मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठित वरिष्ठ नागरिक हाजी इब्राहीम पठाण यांनी दूरध्वनीवरून पारितोषिक विजेते सोहेल शेख व अजीम खान यांचे अभिनंदन करत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमामुळे जनुना गावातील युवकांमध्ये क्रीडा व आरोग्य क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची भावना निर्माण झाली असून, गावासाठी अभिमानास्पद अशी ही घडामोड ठरली आहे.




Post a Comment
0 Comments