प्रतिनिधी - शंकर गायकवाड
प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जव्हार येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी श्री. फटांगे यांच्या दालनात जिल्ह्यातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थितीत सविस्तर चर्चा पार पडली.
या बैठकीत मनरेगा, शेतकरी व शेतमजूर प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, मनरेगा मजुरांचे प्रलंबित वेतन, जिल्ह्यातील रस्ते व पाणी समस्या, भूसंपादन, ग्रामीण भागातील स्थलांतर, कुपोषण, एमएसईबी व आरोग्य सुविधा यांसंदर्भातील मुद्दे विभागनिहाय मांडण्यात आले.
होळी सणापूर्वी मनरेगा मजुरांना मजुरीचे पैसे, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान तसेच ‘लाडक्या बहिणी’ योजनेचे थकीत पैसे तत्काळ वितरित करावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांशी भात खरेदी व बोनसबाबतही चर्चा झाली. ज्या शेतकऱ्यांची भात नोंदणी झाली नाही त्यांना मुदतवाढ देऊन सर्व पात्र शेतकऱ्यांचा भात खरेदी करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड तालुक्यात जंगलातील डिंक, वनबीज व औषधी वनस्पतींची बाजारभावापेक्षा कमी दरात खरेदी करून आदिवासी समाजाची होणारी लूट थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश दिल्याचे सांगितले.
बैठकीस पराग पष्टे, बळवंत गावित, मधुकर चौधरी, संपत पवार, प्रमिलाताई शैलेश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments